सिल्लोड, (प्रतिनिधी) माहेरून फ्रुट व्यवसायासाठी सात लाख रुपये आण असा तगादा लावत सतत मारहाण करून मानसिक त्रास देणाऱ्या पती व सासरच्या त्रास कंटाळून विवाहितेने पाच महिन्याची गरोदर असतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हसूल येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आएशा बेगम अरबाज शेख वय २३ रा अजिंठा ता सिल्लोड हल्ली मु. हर्सल, जि संभाजीनगर असे आहे.
सदरील आत्महत्या प्रकरणी विवाहितेची आई नूरजहाँ बेगम शेख रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मयत विवाहितेचा पती नामे अरबाज सलिम शेख, सासू सायरा सलिम शेख, जेठ अलिम सलिम शेख सर्व राहणार ९११ किदवई नगर नायगांव रोड, मोहम्मदीया मस्जिद जवल, भिवंडी, ठाणे या सर्व आरोपिं विरुद्ध हसूल पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. मयत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की माझ्या मुलीचे लग्न तीन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये मुस्लिम रितीरिवाज प्रमाणे शेख अरबाज सलिम यांच्याशी झाले.
लग्नानंतर त्यांना एक दिड वर्षांचा मुलगा देखील आहे. पती व सासरची मंडळी माझ्या मुलीस सतत मारहाण व पैशाची मागणी करीत होते. या बद्दल मी व माझ्या पतीने तसेच माझ्या भावाने वरील आरोपीस या प्रकरणी समजून घालण्याचा भरपूर प्रयत्न केला. काही दिवस त्यांनी माझ्या मुलीस चांगले वागवले मात्र पुन्हा तिला त्रास देण्यास सुरुवात करून पैशाची मागणी लावून धरली मात्र आमची परिस्थिती गरिबीची असल्याने आम्ही पैशाची पूर्तता करू शकलो नाही.
त्यामुळे मागील महिन्यात माझ्या जावयाने माझ्या मुलीस माहेरी पाठवून दिले. त्यामुळे माझी मुलगी सतत तणावात राहत होती. ती पाच महिन्याची गरोदर असतांना माझ्या मुलीने या सतत च्या मानसिक शारीरिक छळाला कंटाळून २५ डिसेंबर रोजी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने सुसाइड नोट ही लिहिले होते. या तक्रारीवरून हसूल पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पी एस आय गणेश शिवराम केदार तपास अधिकारी म्हणून तपास करत आहे.















